Ad will apear here
Next
रिक्षा आणि सरकार!
प्रातिनिधिक छायाचित्रसर्वत्र कोरोनाच्या चर्चा सुरू असतानाही काल एका वेगळ्याच, अनपेक्षित व त्यामुळे धक्कादायक असलेल्या एका बातमीने लोकांची झोप उडाली. खरे तर अशा घटना कुठेकुठे अधूनमधून होत असतात; पण या घटनेची मात्र जोरदार चर्चा सुरू झाली. अनेकांच्या भुवया उंचावल्या, संशयाचे वारेही वेग घेऊ लागले. नेमके याच काळात, जेव्हा सारे लक्ष एखाद्या संकटाचा सामना करण्यावर केंद्रित झालेले असतानाच असे कसे घडले असेही अनेकांना वाटून गेले. त्यावरही कडी म्हणजे, या घटनेत नेमके काय नष्ट झाले, असा जुन्या घटनेत अधोरेखित झालेलाच सवाल पुन्हा एकदा पुढे आला. 

एका गंभीर समस्येमुळे अस्थिरता आणि अनिश्चिततेचा भस्मासुर अवघे भविष्य कवेत घेऊ पाहत असताना असे घडणे हे अघटितच! पण तरीही ते घडले. ‘हा अपघात असू शकतो’ असा सहज विचार करावयासही फारशी कुणाची तयारी जाणवली नाही.

मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर सोमवारी लागलेल्या त्या आगीमुळे, आता राजकीय चर्चांनाही ऊत येईल. अशा स्थितीत, अस्थिरतेचा सामना करण्याचे मनोबल कायम राखणे हे सत्ताधाऱ्यांपुढे मोठे नवे आव्हान असेल. अगोदरच ठाकरे सरकार ही तीनचाकी रिक्षा आहे. एका किमान समान कार्यक्रमाच्या इंधनावर ही रिक्षा ढकलण्याचे ‘शिव-धनुष्य’ उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर देण्यात आले आहे. हे सरकार चालविण्याची व अशाही परिस्थितीत राज्याच्या जनजीवनाचा किंवा दैनंदिनीचा तोल ढळू न देण्याची त्यांची प्रामाणिक इच्छा असावी असे दिसते. अशा काळात तीनही चाकांनी एका गतीनेच नव्हे, तर एका दिशेने चालणे गरजेचे असते. प्रत्यक्षात मात्र, प्रत्येक चाक आपल्या आपल्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न सुरू असलेला दिसतो. सरकारने धोरण म्हणून एखादा निर्णय घ्यावा, शिष्टाचारानुसार नोकरशाहीने तो जाहीर करून अमलात आणण्याचे आदेश जारी करावेत आणि सत्तेवरील एका चाकाने त्याला टाचणी लावून दुसऱ्या चाकातील हवा काढून घ्यावी, असेही घडताना दिसू लागले आहे. कोरोनाच्या फैलावास आळा घालण्याच्या कठोर उपायांचा भाग म्हणून, या आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या अंत्यविधीबाबत मुंबई महापालिकेने सरकारच्या वतीने काही ठोस निर्णय घेतला, आदेश जारी केले आणि एका मंत्र्याने तो निर्णय बासनात गुंडाळण्यास भाग पाडले.

मंत्रालयातील आग आणि मंत्र्याचा हस्तक्षेप या दोन भिन्न घटना. एकाच दिवशी घडल्या हा त्यातील समान धागा! अशा घटनांमुळे संशय वाढतो, आणि त्याचे निराकरण करण्यात वेळ व शक्ती वाया जाते. अशा कामात वेळ आणि शक्ती वाया घालविणे सध्या परवडणारे नाही. त्यामुळे अस्थिरतेत भर पडू शकते. ते टाळले नाही, तर किमान समान कार्यक्रम हा विनोद होईल. तसे झाले तर काय होते हे भूतकाळाने दाखवून दिले आहे. त्यामुळे निर्माण होणारी अस्थिरता वर्तमानकाळात परवडणारी नाही. म्हणून आता काहीही झाले, तरी ही तीनचाकी रिक्षा रेटत न्यावीच लागेल. ती जबाबदारी पार पाडणे हे ठाकरे यांची कसोटी असेल. एक चाकातील हवा काढून घेतली तर वाहन भरकटते. वेग मंदावतो. चालविण्याची व दिशा चुकू न देण्यासाठी जास्त ताकद लावावी लागते. तेही करावे लागेल.

कारण बिघडलेले वाहन चालविण्यास दुसरे कोणी पुढे येईल अशी शक्यता नाही!

गाडी पुढे नेत राहावेच लागेल...
- दिनेश गुणे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZKYCK
Similar Posts
आशावाद आणि इच्छाशक्ती... देविदास राठोड हे पालघरजवळील मनोर येथील ५५ वर्षांचे गृहस्थ एसटी महामंडळात कंडक्टर म्हणून काम करतात. पालघरहून मुंबईच्या केईएम इस्पितळात येणाऱ्या २५ डॉक्टरांना दररोज आणण्या-नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांचे घर पालघरपासून सुमारे २१ किलोमीटर अंतरावर आहे. त्या दिवशी त्यांना पालघरला येण्यासाठी एकही
माणुसकीची कसोटी! करोनाने माणुसकीची परीक्षा घ्यायचे ठरविले आहे. ही परीक्षा संपूर्ण जगभरात एकाच वेळी होणार असल्याने, वंश, धर्म, देश, प्रांत यांच्या पलीकडे जाऊन साऱ्या परीक्षार्थींना त्यामध्ये उतरावेच लागेल. ती परीक्षा उत्तीर्ण झालो, की मगच आपण करोनाचा पराभव केला असे म्हणता येईल.
वर्ल्ड ॲट होम... आभासी मंचावरून जगाला एकत्र आणून करोनाविरोधी लढ्यातील आघाडीच्या वीरांना सलाम करण्यासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत्या १८ तारखेला जगभर कृतज्ञता सोहळा साजरा होणार आहे. ‘वन वर्ल्ड : टुगेदर ॲट होम’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम येत्या १८ तारखेला प्रसारमाध्यमांच्या जागतिक मंचांवरून सादर करण्याचा संकल्प
दिवस... पक्ष्यांचा आणि माणसांचा! सकाळ उजाडली, उन्हं अंगावर आली तरी आपापल्या घरट्यात आज पक्ष्यांना जागच आली नाही. कशी येणार? रस्त्यावर आणि आजूबाजूला कुठेही कसलाच आवाजही येत नव्हता. गाड्यांच्या आणि कर्कश्श आवाज करीत पहाटरंगी प्रकाशाला चिरत पळणाऱ्या मोटारसायकलींचा सवयीचा ध्वनी अजून कानावरही पडलाच नव्हता. कॅरियरला लटकावलेल्या दुधाच्या किटल्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language